मार्केटयार्डातील व्यापार्‍याला पाकिस्तानातून धमकी   

व्यापार्‍यांची पोलिसांकडे तक्रार

पुणे : तुर्कीमधून आयात होणार्‍या सफरचंदावर मार्केटयार्डातील व्यापार्‍यांनी बहिष्कार टाकला होता. त्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील एका सफरचंद व्यापार्‍याला पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित व्यापार्‍याने पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिल्याची प्राथमिक आहे. 
 
या घटनेबाबत पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. तसेच व्यापार्‍यांना धमकी आल्यामुळे दक्षता म्हणून त्यांना संरक्षण देण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आल्याची माहिती संबंधित व्यापार्‍याने दिली आहे. मार्केट यार्डातील एका व्यापार्‍याने काही दिवसांपूर्वी तुर्की सरकारच्या भारतविरोधी भूमिकेचा निषेध करत त्यांच्या देशातून येणार्‍या सफरचंदांची आयात आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्याने समाज माध्यमावर पोस्टही केली होती, जी मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली होती. त्यानंतर हा ट्रेंड संपूर्ण देशभर सुरु झाला होता.
 
या पोस्टनंतर काही दिवसांनी संबंधित व्यापार्‍याला आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून एक फोन आला. त्यामध्ये पाकिस्तानातील एका व्यक्तीने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली, अशी माहिती व्यापार्‍याने दिली आहे.  
 
धमक्यांना घाबरणार नाही
 
तुर्कीचे सफरचंद न विकण्याचा निर्णय मी केवळ देशहितासाठी घेतला होता. अशा धमक्यांना घाबरून आम्ही आमचा सफरचंद न विकण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचे निश्चय व्यापार्‍यांनी केला आहे. त्यामुळे धमकी आली तरी आम्ही तुर्कीचे सफरचंद विकणार नसल्याचेही व्यापार्‍यांनी स्पष्ट केले. 

Related Articles